Indapur News | कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
इंदापूर, प्रतिनिधी 
राज्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे २४ जिल्ह्यांतील अंदाजे १ लाख ५०० एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी नुकसानग्रस्त क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच शासनाकडून तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषिमंत्री भरणे यांनी शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बु. आणि लाखेवाडी परिसरातील नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला. पाहणीवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार जीवन बनसोडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, हवामान बदलामुळे राज्यात झालेल्या वादळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बाधित क्षेत्रातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. तसेच कृषी विभागाने विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार असून भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे.
To Top