Pune News l पुण्यात १४२ गुन्हे..! ११६ आरोपी अटकेत; अवैध दारू व्यवसायावर उत्पादन शुल्क विभागाचा मोठा प्रहार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे, प्रतिनिधी 
पुणे, दि. ६ : फुगेवाडी, दापोडी व हडपसर येथील प्रथमदर्शनी मेथेनॉल मिश्रित गावठी दारूप्राशन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून, २९ मे ते ४ जून या कालावधीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत तब्बल १ कोटी ४७ लाख २७ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे आणि पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत विभागाने १४२ गुन्हे नोंदवून ११६ आरोपींना अटक केली आहे.
कारवाईदरम्यान ८ हजार ४७२ लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली, तर गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ६९ हजार २७१ लिटर रसायन जागीच नष्ट करण्यात आले. याशिवाय ११ हजार ७३३ लिटर परराज्यातील व बनावट मद्य जप्त करण्यात आले असून अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ११ वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री व निर्मितीची हॉटस्पॉट ठिकाणे ओळखून तेथील हातभट्टी केंद्रे नेस्तनाबूत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हातभट्टीसाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्या पुरवठादारांनाही गुन्ह्यात आरोपी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करताना महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ च्या कलम ९३ अंतर्गत चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी १२५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, मेथेनॉल मिश्रित दारूप्राशनामुळे झालेल्या मृत्यूंचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणाशी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडीच्या समन्वयाने सुरू आहे.

जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना विषारी दारूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अवैध दारू व्यवसायाशी संबंधित बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्याची विनंती केली आहे. ग्रामपंचायती, तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंचांना गावठी दारू निर्मिती व विक्रीबाबत माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या वीजजोडण्या तोडण्याबाबत महावितरणला सूचना देण्यात आल्या असून, गुळाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मेथेनॉलचा गैरवापर रोखण्यासाठी औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यातील सर्व मेथेनॉल परवानाधारक व पुरवठादारांची माहिती घेण्यात आली असून, त्यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम १६८ अंतर्गत नोटिसा देण्यात आल्या आहेत. अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याचे आवाहन करताना अधीक्षक अतुल कानडे यांनी नागरिकांना अशा बेकायदेशीर धंद्यांची माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा ०२०-२६१२७३२१ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Tags
To Top