सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती, प्रतिनिधी
बारामती वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ तसेच कांद्याच्या घसरत्या बाजारभावाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी गुरुवारी बारामतीमध्ये जोरदार आंदोलन छेडले. शहरातील तीन हत्ती चौक परिसरात आयोजित या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचा आरोप केला. तसेच बेरोजगारीच्या वाढत्या समस्येमुळे युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि शेतकऱ्यांना मिळत असलेल्या अपुऱ्या दरांबाबतही सरकारवर टीका करण्यात आली. विशेषतः कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विविध जनहिताच्या प्रश्नांवर राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत असून, त्याचाच एक भाग म्हणून बारामतीतील हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनामुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात पक्षाकडून आणखी तीव्र आंदोलनांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
