Indapur News | खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी कळसमध्ये बेमुदत उपोषण; शेतकरी आक्रमक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
इंदापूर : संतोष माने 
 खडकवासला कालव्याचे पाणी तातडीने इंदापूर तालुक्यात सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कळस येथील भगवान बाप्पू खारतोडे यांनी तलाठी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे खडकवासला कालव्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खडकवासला कालव्याचे आवर्तन १२ मे रोजी सुरू झाले असले तरी अद्याप इंदापूर तालुक्यापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. परिणामी शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांपूर्वी कळस परिसरातील शेतकऱ्यांनी पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज क्रमांक २ येथे रास्ता रोको आंदोलन केले होते.
यावेळी खडकवासला कालव्याचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी घटनास्थळी येऊन पाणीपुरवठ्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. जवळपास दीड तास महामार्ग रोखून धरल्यानंतर बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दादा दडस यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. दरम्यान, मागील आठवड्यात पुणे येथील सिंचन भवनमध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच शेतकरी प्रतिनिधी यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर ३ जूनपासून पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. मात्र, आजतागायत इंदापूर तालुक्यात पाणी पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.

खडकवासला कालव्याच्या पाण्यावर तालुक्यातील हजारो एकर शेती अवलंबून आहे. तसेच अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे भवितव्यही या पाण्यावरच अवलंबून असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे शेतकरी आता आक्रमक भूमिका घेत असून रास्ता रोको, उपोषण यांसारख्या आंदोलनांचा मार्ग स्वीकारत आहेत.

खडकवासला कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नाची शासनाने आणि जलसंपदा विभागाने तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
To Top