Satara Accident l सातारा-रहिमतपूर मार्गावर भीषण अपघात; इनोव्हा झाडावर आदळून पलटली, महिलेचा जागीच मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा, प्रतिनिधी
सातारा-रहिमतपूर मार्गावरील तासगाव हद्दीत बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव इनोव्हा कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळून अनेक पलट्या घेतल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील लतीफ मुलाणी (वय 33), धनाजी शिवाजी जाधव (वय 48) आणि सौ. सुनीता धनाजी जाधव (वय 36) हे मंगळवारी रात्री इनोव्हा (एमएच 50 एई 6676) कारमधून सातारा-रहिमतपूर मार्गावरून प्रवास करत होते. पहाटे एकच्या सुमारास तासगाव गावाच्या हद्दीत वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली. धडकेनंतर कारने दोन ते तीन पलट्या घेतल्या.
या भीषण अपघातात सुनीता जाधव या कारमधून बाहेर फेकल्या गेल्या आणि त्यांच्यावरच वाहन कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर लतीफ मुलाणी आणि धनाजी जाधव हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम आणि हायवे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाने सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न करून महिलेला वाहनाखालून बाहेर काढले. जखमींना त्वरित उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बचावकार्यात श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे चंद्रसिंग पवार, रोहित बनसोडे, ऋषिकेश रंकाळे, देवा गुरव, अथर्व बीडकर, अभिजित शेलार तसेच हायवे रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनाचा वेग, चालकाचा ताबा सुटणे अथवा अन्य कारणांबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
To Top