सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी, "पोलिओमुक्त भारत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पोलिओवर मात करण्यासाठी लसीकरण हाच सर्वात प्रभावी मार्ग असून प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत," असे आवाहन केले.
त्या पुढे म्हणाल्या की, पोलिओ प्रतिबंधक लसीमुळे बालकांचे आयुष्य सुरक्षित व निरोगी राहण्यास मदत होते. निरोगी बालक, निरोगी कुटुंब आणि निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कल्पना पंडित, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येणार असून, या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
