Rajgad Breaking l पाबे घाटात भीषण अपघात; ट्रॅव्हल्स ५० फूट दरीत कोसळली, दोघांचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांच्या ट्रॅव्हल्सला पाबे घाटात भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२८ जून) पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात अनेक जण गंभीर व किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खाजगी कंपनीतील २२ जणांचा ग्रुप ट्रॅव्हल्स (एमएच ४७ एएस ०९३४) मधून राजगड किल्ला पाहण्यासाठी येत होता. पाबे घाट उतरत असताना पाबे गावाजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्सने रस्त्यावरील संरक्षण कठडा तोडत सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत एक पलटी मारत कोसळली.
या भीषण अपघातात विश्वास बाबुराव सातिम (वय २५, रा. मुंबई) व ध्वनी चंद्रेश ठक्कर (वय २३, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरीत कोसळलेल्या ट्रॅव्हल्सचा चालक वाहनाखाली अडकला होता. वाहन दरीतील झाडाला अडकल्याने तसेच डिझेल गळतीमुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने वाहन उचलून अथक प्रयत्नांनंतर सर्व जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
जखमींना तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले असून इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
या बचाव मोहिमेत वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी निलेश राणे, आकाश पाटील, पंकज मोघे तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर आणि कृष्णा मरगळे यांनी सहभाग घेतला.
To Top