Purandar News l पुरंदर तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वी; 210 बूथवर बालकांना पोलिओचे डोस

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
जेजुरी : पंढरीनाथ शिंदे 
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पुरंदर तालुक्यात रविवारी आरोग्य विभागामार्फत मोठ्या उत्साहात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांच्या उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनाखाली पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 36 उपकेंद्रांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचत 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे मोफत डोस देण्यात आले.
तालुक्यात एकूण 210 लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक आणि विविध आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. सासवड नगरपालिका हद्दीत 22, तर जेजुरी नगरपालिका हद्दीत 14 बूथवर लसीकरण करण्यात आले. जेजुरी रेल्वे स्थानक व खंडोबा मंदिर परिसरात येणाऱ्या बालकांनाही पोलिओचे डोस देण्यात आले.
मोहीमेपूर्वी आरोग्य विभागाने गावागावांत जाऊन व्यापक जनजागृती केली होती. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक-सेविका, सीएचओ, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सक्रिय सहभाग घेतला.
मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य विस्तार अधिकारी प्रकाश चौरे, तालुका आरोग्य निरीक्षक शिवाजीराव भोसकर, तालुका क्षयरोग पर्यवेक्षक अकबर नाईकवाडी व फिरोज महंत, दादासाहेब जगताप, समूह संघटक गणेश शिंदे, मोनाली काळाणे, रेश्मा टिके यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी व मार्गदर्शन केले. तसेच नगरपालिका हद्दीत आरोग्य निरीक्षक विजय सोनवणे, विजय मोरे, संतोष भोसले, संजय रोटे आणि फिरोज तांबोळी यांनीही मोहिमेवर देखरेख ठेवली.

लसीकरण मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी सांगितले की, चुकून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या किंवा परगावी गेलेल्या बालकांचा पुढील तीन दिवसांत घरोघरी जाऊन शोध घेऊन त्यांनाही पोलिओचे डोस दिले जाणार आहेत.
To Top