सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला राजगड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तालुक्यातील एकूण ९७.६९ टक्के बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात एकूण २,०७४ बालकांचे लसीकरण करण्यात आले. नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेची आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दखल घेत समाधान व्यक्त केले.
करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे सभापती अमोल नलावडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी करंजावणे, पासली व पानशेत प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. केंद्रांवरील नियोजन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामकाज आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
तालुक्यातील करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १,२०९, पासली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८१ आणि पानशेत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६०१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले होते.
लसीकरण मोहिमेदरम्यान जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा राऊत, उपसभापती संदीप खुटवड, पंचायत समिती सदस्य गणेश जागडे आणि सीता खुळे यांनी विविध लसीकरण केंद्रांना भेटी देऊन मोहिमेचा शुभारंभ केला. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करत पालकांनाही बालकांचे वेळेत लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. तालुक्यात एकूण १२८ लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी २४८ आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी नियोजन केले होते, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला तालुक्यात मिळालेला प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेने केलेले नियोजन यामुळे राजगड तालुका पोलिओमुक्त भारताच्या संकल्पनेला अधिक बळकटी देणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
