Satara crime | बिल मागितल्याच्या रागातून बिअर बारमध्ये धुडगूस; मॅनेजरच्या डोक्यात बाटली फोडून गोळ्या घालण्याची धमकी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
बिअर बारमध्ये दारूचे ३,२५० रुपयांचे बिल काऊंटरवर भरा, असे सांगितल्याच्या कारणावरून चौघांनी बारमध्ये धुडगूस घालत मॅनेजरला मारहाण केली. यावेळी मॅनेजरच्या डोक्यात दारूची बाटली फोडून गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय गोरखनाथ वाघमळे (वय ३२, सध्या रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) हे मतकर कॉलनी येथील एका बिअर बारमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. २७ जून रोजी रात्री बारमध्ये आलेल्या ग्राहकांना दारूचे ३,२५० रुपयांचे बिल काऊंटरवर भरण्यास सांगितले. याचा राग आल्याने साहील रणदिवे, रोशन यादव, आदित्य वाघमारे आणि रुद्र अवघडे (सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांनी वाद घालत शिवीगाळ आणि दमदाटी केली.
यानंतर आरोपींनी मॅनेजरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडून जीवे मारण्याची व गोळ्या घालण्याची धमकी दिली. यावेळी काऊंटरवरील दारूच्या बाटल्यांचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे बार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधित चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
To Top