सोमेश्वर रिपोर्टर टीम----
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूरात प्रतिबंधित पानमसाला, तंबाखूचा २ लाख ४२ हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही धडक कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान पोलीस ठाण्यातून संशयास्पदरीत्या गायब झालेल्या आरोपीस ८० किलोमीटर पाठलाग करुन पोलीसांनी पकडले आहे.
इम्रान हुसेन शेख ( वय ३८ वर्षे, रा. चाळीस फुटी रस्ता, बाजारतळ, इंदापूर) असे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे ( रा.मोशी प्राधिकरण पुणे) यांनी त्याच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ( दि.१९) सकाळी साडेसहा वाजता ही कारवाई करण्यात आली.अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत, अक्षय शेळके यांनी भाग घेतला. दोन साक्षीदारांच्या समक्ष ही कारवाई करण्यात आली.
आरोपीच्या घराची व घराशेजारी असणाऱ्या त्याच्या पेढीची तपासणी करण्यात आली. मात्र तेथे काहीच आढळले नाही. जुन्या पुणे सोलापूर महामार्गालगत असणा-या बशीरभाई मळा परिसरातील 'ए बी एस शॉपिंग कॉर्नर'मधील गाळ्यात सारा मुद्देमाल सापडला.
यानंतर पुढील तपासकामी आरोपीला इंदापूर पोलीस ठाण्यात आणले असता, काही वेळानंतर आरोपी संशयास्पदरित्या तेथून गायब झाला. या प्रकाराची चर्चा होवू लागल्यानंतर आरोपीने पलायन केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले. इंदापूर पोलीस ठाण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीसांनी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले. सकाळी सात वाजता गायब झालेल्या आरोपीस सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन मोहिते, पोलीस हवालदार पोपट नाळे, पोलीस कॉन्स्टेबल आबा जाधव, सुरज धोत्रे नागनाथ पर्गे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
