सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोरच्या करंजगाव येथील दिव्यांग व्यक्ती खंडाळा येथे जागरण गोंधळासाठी गेली होती.खंडाळा येथील बस स्थानकावर मित्राची वाट पाहत असताना दोन अज्ञात इसमांनी दिव्यांग महेश सोनबा मळेकर (वय - २९) रा. करंजगाव ता.भोर( व्यवसाय- जागरण गोंधळ) यांना मारहाण करून त्यांच्या जवळील मोबाईल,अंधकाठी तसेच हेडफोन बाळकावून लुबाडण्याची घटना रविवार दि.३१ रात्री साडेआठच्या सुमारास घडली.घटनेची फिर्याद दिव्यांग व्यक्तीने खंडाळा पोलिसात दिली.
भोर तालुक्यातील दिव्यांग महेश मळेकर जागरण गोंधळ कार्यक्रमात ऑर्गन वाजवण्याचे काम करीत असतात.मळेकर यांना खंडाळा येथील कार्यक्रमासाठी बोलावले असल्याने ते खंडाळा बस स्थानकापर्यंत एसटीच्या साह्याने प्रवास करून रात्री आठ वाजता पोहोचले होते.
बस स्थानकात जागरण गोंधळाच्या कार्यक्रम असणाऱ्या व्यक्तीची वाट पाहत बसले असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना आम्ही तुम्हाला नेण्यासाठी आलो आहोत असे म्हणून बस स्थानकाच्या बाहेरील बाजूस नेऊन त्यांना जबर मारहाण केली.यात ते जखमी झाले असून अज्ञात चोरट्यांनी त्यांचा मोबाईल,हेडफोन तसेच अंधकाठी पळून नेली.दिव्यांग अंध महेश मळेकर यांना अज्ञातांकडून झालेली मारहाण निंदनीय आहे.खंडाळा पोलिसांनी तात्काळ दिव्यांग व्यक्तीला मारहाण करणाऱ्या अज्ञातांना अटक करून कडक शिक्षा द्यावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटना भोर अध्यक्ष बापू कुडले यांच्याकडून करण्यात आली. पुढील तपास खंडाळा पोलीस करीत आहेत.
