सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात उन्हाचा कडाका वाढत असताना पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल झाले आहेत. सध्या तालुक्यातील १५ गावांकडून टँकर मंजुरीसाठी प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी पाच गावांमध्ये प्रत्यक्ष टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
चाकाटी, कळस, शेटफळगडे, वकीलवस्ती आणि लुमेवाडी या गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. या गावांसाठी एकूण ७ टँकर मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये चाकाटीसाठी १, कळससाठी २, शेटफळगडेसाठी २, वकीलवस्तीसाठी १ आणि लुमेवाडीसाठी १ टँकरचा समावेश आहे.
दरम्यान, बावडा, म्हसोबावाडी, अकोले, वायसेवाडी, रूई (थोरातवाडी), शेटफळगडे, लामजेवाडी, पिटेवाडी, पोंदकुलवाडी, सुरवड आणि निरनिमगाव आदी गावांकडूनही टँकर मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत तालुक्यातील पाणीटंचाईची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील १५ गावांनी टँकरची मागणी केली असली तरी सध्या केवळ पाच गावांमध्येच प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेऊन पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
