Rajgad News | पानशेत वसाहतीजवळील 68 वर्षे जुना पूल वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : प्रतिनिधी 
पुणे, दि. २ : राजगड तालुक्यातील खानापूर–पानशेत मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने तो सर्व प्रकारच्या जड व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
खानापूर ते पानशेत मार्गावरील (प्र.जि.मा. 37) कि.मी. 14/245 येथील हा पूल तब्बल 68 वर्षांहून अधिक जुना असून, नुकत्याच करण्यात आलेल्या विशेष तांत्रिक परीक्षणात त्याची स्थिती अत्यंत कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी पावसाळ्यात मुठा नदीच्या पाण्याच्या विसर्गामुळे पूल अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने संभाव्य दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही निश्चित केले आहेत. लवासा, वरसगाव व परिसरातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर रस्ता–डवजे–कोंढूर–बहुली–कातवडी–मांडवी–कुडजे–खडकवासला धरणमार्ग–गोऱ्हे–खानापूर या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत व वरसगाव धरण परिसरातून पुण्याकडे येणारी वाहतूक कुरण खुर्द–राणवडी–सोनपूर–ओसाडे–खानापूर–गोऱ्हे–खडकवासला धरणमार्ग–कुडजे–मांडवी–कातवडी–बहुली–कोंढूर–डवजे–निळकंठेश्वर मार्गे वळविण्यात येणार आहे.

नागरिकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
To Top