Pune News | जनगणनेबाबत सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
 पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या ‘जनगणना 2027’च्या घरसूचीकरण व घरगणना सर्वेक्षणाबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, दिशाभूल करणारे संदेश आणि अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया अधिकृत, सुरक्षित, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले की, सोशल मीडियावर जनगणना प्रक्रियेबाबत खोटी संकेतस्थळे आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांवरच विश्वास ठेवावा.
महापालिकेने नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत जनगणनेचे काम सुरू असून, या प्रक्रियेत कोणत्याही कागदी फॉर्मचा वापर केला जात नाही. मोबाईलवरील अधिकृत ‘एचएलओ ॲप’द्वारे ऑनलाइन स्वरूपात माहिती नोंदविली जात आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, ‘जनगणना 2027’च्या पहिल्या टप्प्यातील घरसूचीकरण व घरगणनेच्या प्रत्यक्ष कामास 16 मे 2026 रोजी सुरुवात झाली असून ही प्रक्रिया 14 जून 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. एचएलओ ॲपच्या माध्यमातून घरांचे सर्वेक्षण सुरक्षित, अचूक आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात यशस्वीपणे पूर्ण केले जात आहे.
प्रशासनाने नागरिकांना खोट्या संकेतस्थळांपासून आणि सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अचूक जनगणना ही शहर विकासाची भक्कम पायाभरणी असून, शाळा, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते तसेच इतर नागरी सेवांचे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी अचूक माहिती अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

जनगणना अधिकारी केवळ आवश्यक माहितीच नोंदवतात. ते कोणतेही आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा इतर सरकारी कागदपत्र, बँक तपशील अथवा मोबाईल ओटीपी मागत नाहीत. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करून शहर विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी-
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा, अप्रमाणित माहिती किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी केवळ अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांनाच सहकार्य करावे. संपूर्ण जनगणना प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात ‘एचएलओ ॲप’च्या माध्यमातून राबविली जात आहे.

सचिन पवार, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी-
जनगणना 2027 अंतर्गत माहिती संकलनाचे काम अधिकृत प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत ‘एचएलओ ॲप’च्या माध्यमातून पूर्णतः ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. नागरिकांनी अफवा किंवा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. जनगणना अधिकारी कोणतेही कागदपत्र, बँक तपशील किंवा मोबाईल ओटीपी मागत नाहीत.
Tags
To Top