Baramati News | SRPF भरतीत विवेकानंद अभ्यासिकेच्या चार विद्यार्थ्यांची घवघवीत भरारी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर, प्रतिनिधी 
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) सन २०२४-२५ च्या पोलीस भरतीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सोमेश्वरनगर येथील विवेकानंद अभ्यासिकेच्या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन करत पोलीस दलात स्थान मिळवले आहे. एकाच अभ्यासिकेतील चार विद्यार्थ्यांची निवड झाल्याने सोमेश्वर पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथील सुनील शेंडगे याची SRPF गट क्रमांक २०, वरणगाव येथे निवड झाली आहे. तर बारामती तालुक्यातील मोटेवाडी येथील सुखदेव मोटे याने SRPF गट क्रमांक ०५ मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच सोमेश्वरनगरचा सोमनाथ घोरपडे आणि वाल्हे गावचा सुरज पवार या दोघांची SRPF गट क्रमांक ०७, दौंड येथे निवड झाली आहे.
विशेष म्हणजे, सोमेश्वरनगरचा रहिवासी असलेल्या सोमनाथ घोरपडे याने अवघ्या २० व्या वर्षी पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याच्या या यशामुळे परिसरातील अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळाली आहे.
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे कष्ट तसेच विवेकानंद अभ्यासिकेतील मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

या चारही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
To Top