Jawali News | शिवराज्याभिषेकाचा उत्साह शोकात; रायगडावरून परतताना केंजळच्या शिवभक्त युवकाचा अपघाती मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम
मेढा : सोमनाथ साखरे
किल्ले रायगडावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह जावली तालुक्यासाठी दुःखद ठरला. सोहळ्यास उपस्थित राहून परतणाऱ्या केंजळ येथील एका तरुण शिवभक्ताचा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर परिसरात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे केंजळ गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
केंजळ येथील कपिल धनंजय केंजळे (वय २८) हे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर गेले होते. सोहळा आटोपल्यानंतर ते आपले सख्खे मावसभाऊ अविनाश सावंत (वय ४२, रा. चिचणी) यांच्यासोबत दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान, पोलादपूरजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या कपिल केंजळे यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे केंजळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात जखमी झालेल्या अविनाश सावंत यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. कपिल केंजळे हे शिवप्रेमी, उत्साही आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले युवक म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
To Top