सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड, प्रतिनिधी
जलसंपदा विभागाचे अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या हत्येप्रकरणी वापरण्यात आलेल्या कारसह मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. कारवर कोणतीही नंबर प्लेट नसल्याने आणि मुख्य संशयित सुरेखा मंडलेकडून ठोस माहिती मिळत नसल्यामुळे तपासाला काहीसा विलंब होत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणातील संशयित सुरेखा मंडले आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण (रा. सुरूल, ता. वाळवा) यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान सुरेखा मंडलेकडून मारेकऱ्यांबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसल्याचे, तर संग्राम चव्हाणही या प्रकरणापासून हात झटकत असल्याचे समजते.
तपासासाठी सातारा, सांगली तसेच मुंबईकडे विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. काही सराईत संशयित पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, कराड शहरासह विविध ठिकाणांतील वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक चौकशीत हत्येवेळी वापरलेल्या कारची नंबर प्लेट जाणूनबुजून काढून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित वाहनाच्या मालकाचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
मात्र, मारेकऱ्यांबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात असून, येत्या एक-दोन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लक्ष्मण मंडले यांची मागील वर्षी कराडमधून बदली झाली होती. त्यांच्या मूळ गावी घर आणि शेती असून काही महिन्यांपासून नवीन घराचे बांधकाम सुरू होते. मात्र हे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यांच्या अकाली निधनामुळे गावातील स्वतःचे घर उभारण्याचे स्वप्न अपूर्णच राहिल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
