सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद-खंडाळा मार्गावरील बिरोबा वस्ती परिसरात भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात पिकअप चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून येणाऱ्या केटीएम दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार वैभव अधिक माने (वय २३, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा) हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमी वैभव माने यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतर पिकअप चालकाने जखमीला उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी सागर शिवाजी धायगुडे (रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
