Rajgad News l पुतण्याच्या लग्नासाठी ठेवलेले ८० हजार रुपये चोरीला; शेणवडमध्ये घरफोडीने खळबळ

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
शेणवड येथे अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करत लग्नासाठी ठेवलेली सुमारे ८० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना रविवारी (दि. १४ जून) उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून वेल्हे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेणवड येथील रहिवासी गणेश बाळू भुरूक (वय ६०) हे शेती व्यवसाय करतात. पुतण्याच्या लग्नासाठी त्यांनी रोख रक्कम घरात ठेवली होती. रविवारी गणेश भुरूक हे कामानिमित्त बालवड येथे गेले होते, तर त्यांची पत्नी गुरे चारण्यासाठी रानात गेली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच घरातील साहित्यही अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे निदर्शनास आले.
भुरूक घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आणि घरातील साहित्य विस्कळीत दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर गणेश भुरूक यांनी तात्काळ वेल्हे पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची फिर्याद दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस हवालदार प्रदीप कुदळे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, गावात दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
To Top