Rajgad News l कानंदजवळ नवजात बालिकेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे
 राजगड तालुक्यातील मौजे कानंद येथील डिंगळीच्या डोंगर परिसरात एका झाडाजवळ अंदाजे एक दिवसांच्या स्त्री जातीच्या नवजात अर्भकाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १६ जून) उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नवजात अर्भक ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय, वेल्हे येथे आणले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी अर्भक मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी अर्भकाचा मृतदेह ससून रुग्णालय, पुणे येथे पाठविण्यात आला असून, या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अर्भक त्या ठिकाणी सोडून देणाऱ्या व्यक्ती अथवा पालकांचा शोध सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांची माहिती तसेच इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अर्भकाबाबत अथवा संबंधित पालकांविषयी कोणास काही माहिती असल्यास त्यांनी वेल्हे पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, दूरध्वनी क्रमांक ०२१३०-२२१२३३, सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते (मो. ९४२१८६८२०१) अथवा पो. स. ई. अमित देशमुख (मो. ९६८९४०१८१७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वेल्हे पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल
To Top