सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षेबाबत कारवाईचा धडाका सुरू केला असून, त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मध्यवर्ती भोजनगृहावर (सेंट्रल कॅन्टीन) मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने भोजनगृह चालवणाऱ्या 'मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस' या संस्थेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
एफडीएच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी १६ जून रोजी भोजनगृहाची अचानक तपासणी केली. या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ स्वतंत्रपणे साठवले जात नसल्याचे, स्वयंपाकघरात तापमान नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसल्याचे तसेच पेस्ट कंट्रोल नियमितपणे करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले.
याशिवाय स्वयंपाकघरातील अस्वच्छता, पाण्याच्या गुणवत्तेबाबत नोंदी नसणे आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे उपलब्ध नसणे यासारख्या गंभीर बाबीही तपासणीत समोर आल्या.
गेल्या महिन्यांपासून मेसमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. अन्नामध्ये अळी, कीड, कॉकरोच तसेच माश्या आढळल्याच्या तक्रारींमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. सोशल मीडियावरही या तक्रारी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर एफडीएने याची गंभीर दखल घेत तपासणीचे आदेश दिले होते. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर अखेर भोजनगृहाचा अन्न परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
सर्व मेस सेवा तात्पुरत्या बंद
कंत्राटदाराचा परवाना निलंबित झाल्यानंतर विद्यापीठातील सेंट्रल कॅन्टीनसह आठही वसतिगृहांतील मेस आणि सेंट्रल रिफेक्टरी सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. आवश्यक सुधारणा पूर्ण करून पुन्हा तपासणी झाल्यानंतरच सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना सध्या जेवणासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धाडसी कारवाई केल्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आभार मानले आहेत.
