सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलिसांनी परवान्याविना फटाक्यांची वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत चार वाहनांसह ७ लाख ७९ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मळद (ता. बारामती) येथील फलटण-बारामती मार्गावरील चिंचबन परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी हे कोणताही वैध परवाना नसताना विविध प्रकारचे फटाके चार वाहनांमधून वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या कारवाईत दोन पेंजो तीनचाकी वाहने, एक महिंद्रा वीरो आणि एक अशोक लेलँड छोटा हत्ती अशा चार वाहनांसह विविध प्रकारचे फटाके जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७,७९,६२८ रुपये असून त्यामध्ये वाहनांची किंमत ६ लाख रुपये तर फटाक्यांची किंमत १ लाख ७९ हजार ६२८ रुपये आहे.
या प्रकरणी सोमनाथ सदाशिव होले (रा. खंडोबानगर, बारामती), संदीप युवराज नेटके (रा. साठेनगर, कसबा बारामती), गणेश बाबासाहेब गरगडे (रा. गुणवरे, ता. फलटण) आणि सुरेश बापूराव गवारे (रा. देसाई इस्टेट, बारामती) यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार वैभव भगवान साळवे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५, २८७ तसेच मोटार वाहन कायदा कलम ६६, १९२ व १९०(३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.
