सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असलेला विदेशी मद्याचा मोठा साठा चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व सातारा भरारी पथकांनी सातारा-लोणंद रोडवरील संयुक्त कारवाईत तब्बल १ कोटी ८६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सातारा-लोणंद रोडवरील तडवळे (स. वाघोली, ता. कोरेगाव) येथील 'हॉटेल रंगिला राजस्थान' समोर भरारी पथकाने सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटलेल्या टाटा कंपनीच्या १० चाकी कंटेनर ट्रकची (NL-01-AF-3549) तपासणी केली असता, त्यामध्ये केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला.
या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील विविध कलमांन्वये गुन्हा (रजि. क्र. ४२५/२०२६, दि. १७ जून २०२६) दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामागे मोठी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे तसेच मुंबई व सातारा भरारी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड पुढील तपास करत असून अमोल चिलगर यांनी फिर्याद दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८०० ८३३ ३३३३, व्हॉट्सॲप ८४२२००११३३ किंवा दूरध्वनी ०२२-२२६६३८८१ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
