सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सातारा : प्रतिनिधी
धोम व धोम-बलकवडी धरणांसह मध्यम प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा जपण्यासाठी जलसंपदा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ११ व ४९ अंतर्गत १६ जून २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून शेतीसाठी होणाऱ्या खाजगी पाणी उपशावर तसेच बिगरसिंचन औद्योगिक वापरासाठीच्या सर्व योजनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ववत सुरू राहणार आहेत.
या बंदीच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी नदीतून पाणी उपसा केल्यास तो अनधिकृत मानला जाईल.
संबंधितांचा पाणी परवाना व वीजपुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल, तसेच उपसा यंत्रसामग्री जप्त करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
धरणांतील मर्यादित पाणीसाठा लक्षात घेऊन बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी किंवा औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीपात्रात सोडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. प्रदूषित पाणी वाहून नेण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्वांनी पाण्याचा अपव्यय व प्रदूषण टाळून जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सं.रा. सातपुते यांनी केले आहे.
