सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याचा गाजावाजा झाला असला, तरी प्रत्यक्षात हे पाणी केवळ नावापुरतेच आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कालव्याचे पाणी रुई गावापर्यंत पोहोचले, मात्र त्यानंतर वरच्या बाजूचे दरवाजे बंद करण्यात आल्याने शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ झाला नाही.
चार दिवस पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र या काळात आलेले बहुतांश पाणी कालव्यातच जिरले. कोणत्याही तलावात पाणी सोडण्यात आले नाही, तसेच कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांचे विद्युत पंपही बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आलेल्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होऊ शकला नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.
खडकवासल्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी डाळज क्रमांक २ येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर सिंचन भवन येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनही केले होते. त्यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली होती.
मात्र प्रत्यक्षात चार दिवस पाणी सोडून ते केवळ रुई गावापर्यंतच पोहोचले. त्यानंतर शासन निर्णय झाल्यामुळे पाणी बंद करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
पाणी वाटपाच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणी देणे अपेक्षित असताना सध्या ‘हेड टू टेल’ पद्धतीने पाणी सोडले जात असल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत. हवेली व दौंड तालुक्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळत असताना इंदापूर तालुक्याला मात्र पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने दुजाभाव होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या इंदापूर तालुक्यातील हजारो एकर ऊस पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आंदोलनानंतरही केवळ आश्वासने देऊन जलसंपदा विभागाने आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
