सुपे परगणा l हरवलेले दीड तोळ्याचे मंगळसूत्र १२ तासांत महिलेला परत; सुपे पोलिसांची तत्पर कामगिरी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेजवळ हरवलेले दीड तोळ्याचे मंगळसूत्र अवघ्या १२ तासांत शोधून मूळ मालक महिलेकडे सुपूर्द करण्याची उल्लेखनीय कामगिरी सुपे पोलिसांनी केली. या तत्परतेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल विकास टेमगिरे (रा. भरतगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांचे गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र सुपे येथील जिल्हा बँकेजवळ हरवले होते. याबाबत त्यांनी सुपे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रार प्राप्त होताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. 
त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल किसनराव ताडगे, महादेव साळुंखे आणि भाऊसाहेब चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी केली.
तपासादरम्यान संबंधित मंगळसूत्र एका महिलेला मिळून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या महिलेशी संपर्क साधून मंगळसूत्र ताब्यात घेतले आणि अवघ्या १२ तासांच्या आत शितल टेमगिरे यांच्याकडे ते परत सुपूर्द केले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सुपे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दाखविलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
To Top