सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई, प्रतिनिधी
वाई तालुक्यातील व्याहळी कॉलनी हद्दीत जोर-वाई मार्गावरील काळुबाई मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चारचाकी वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मृत चालकाचे नाव अभिजीत श्रीनाद यादव असे असून, जखमी महिलेचे नाव चित्रा आनंदा फरांदे असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक चारचाकी वाहन जोर येथून वाईकडे जात होते. शुक्रवारी पहाटे सुमारे ३.३२ वाजण्याच्या दरम्यान काळुबाई मंदिराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या दक्षिण बाजूच्या चरात जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की वाहन पलटी झाले.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने वाहनात अडकलेल्या चित्रा फरांदे यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चालक अभिजीत यादव हे वाहनाखाली अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात अपघातस्थळाच्या सुमारे ५० मीटर आधीपर्यंत ब्रेकचे ठसे आढळून आले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
