सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यातील गवडी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या चोरीत सुमारे २ लाख ११ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवडी येथील सुरेश जावजी गंगावणे यांच्या घराची चावी वापरून अज्ञात व्यक्तींनी बेडरूममधील पत्र्याची पेटी बाहेर काढली. ही पेटी चंद्रकांत धनावडे यांच्या शेतात नेऊन फोडण्यात आली.
त्यातून दोन तोळे वजनाची सुमारे ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, अडीच तोळे वजनाचे सुमारे १ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, अर्धा तोळे वजनाची सुमारे २० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी तसेच ११ हजार ९०० रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ११ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गवडी येथील संतोष विश्वास गंगावणे (वय ३६) व शशिकांत संपत कांबळे (वय ३९) या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगावणे पुढील तपास करीत आहेत.
