सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात सुरू केलेल्या दूध भेसळविरोधी धडक कारवाईचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. बारामती तालुक्यातील वाकी येथील ‘औदुंबर डेअरी फार्म’चे संचालक औदुंबर राजकुमार खैरे यांनी मुंढे यांच्या कार्याचे जाहीर समर्थन करत बारामतीच्या पश्चिम भागात अभिनंदन आणि पाठिंब्याचे मोठे बॅनर लावले आहेत. या बॅनरमधून त्यांनी दूध भेसळीमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान अधोरेखित करत, मुंढे यांच्या कारवाईमुळे भविष्यात दुधाच्या दरात मोठी वाढ होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र खैरे यांनी प्लेक्स लावून कोणावर निशाणा साधला आहे ? याची बारामती तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
राज्यात अनेक वर्षांपासून दूध भेसळीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. कृत्रिम दूध, सिंथेटिक दूध तसेच विविध रसायनांचा वापर करून तयार केलेले भेसळयुक्त दूध बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. अशा परिस्थितीत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात विशेष मोहीम राबवत भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. अनेक ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर औदुंबर खैरे यांनी लावलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बॅनरमध्ये त्यांनी दुधाच्या बाजारपेठेतील एक वेगळे आर्थिक गणित मांडले आहे. त्यांच्या मते, राज्यात प्रत्यक्ष उत्पादित होणाऱ्या दुधाच्या तुलनेत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या दुधाचे प्रमाण अनेक पटींनी जास्त आहे. सध्या १५ लाख लिटर मूळ दूध असताना बाजारात तब्बल ६५ लाख लिटर दुधाची विक्री दाखवली जाते. याचा अर्थ भेसळयुक्त दुधामुळे बाजारात सुमारे चारपट अतिरिक्त दूध येत आहे. त्यामुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नाही. जर ही भेसळ पूर्णपणे रोखण्यात यश आले, तर बाजारातील अतिरिक्त पुरवठा कमी होईल आणि दुधाचे दर लक्षणीयरीत्या वाढतील, असे खैरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आज शेतकऱ्यांना दुधाला सरासरी ३५ रुपये दर मिळत आहे. भेसळमुक्त व्यवस्था निर्माण झाली तर हा दर चारपट वाढून १४० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. प्रत्यक्षात बाजारातील परिस्थिती पाहता १०० रुपये दर मिळणेही अशक्य नाही. तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक आणि धाडसी अधिकारी जर किमान एक वर्ष या पदावर कायम राहिले, तर दुग्ध व्यवसायात आमूलाग्र बदल घडू शकतो. खैरे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. दूध भेसळ ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर ती ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारी गंभीर बाब आहे. अशा भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मुंढे साहेबांनी घेतलेली भूमिका ही प्रामाणिक शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठीही हिताची आहे,असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंढे यांच्या बदलीबाबत काही चर्चा सुरू
असल्याच्या पार्श्वभूमीवर खैरे यांनी सरकारला इशाराही दिला आहे. दबावापोटी किंवा काही स्वार्थी घटकांच्या हितासाठी अशा प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करण्याचा अथवा त्यांना पदावरून हटविण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी गप्प बसणार नाहीत. राज्यभरातील दूध उत्पादक एकत्र येऊन रस्त्यावर उतरतील आणि याचे रूपांतर तीव्र जनआंदोलनात केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात लावण्यात आलेल्या या बॅनरची सध्या बारामती तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरही या बॅनरचे फोटो आणि संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक दूध उत्पादक शेतकरी खैरे यांच्या भूमिकेला समर्थन देत आहेत. तर काही जणांनी दुधाच्या दराबाबत मांडलेल्या गणितावर चर्चा सुरू केली आहे.
एकूणच, दूध भेसळविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातून तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ उघडपणे भूमिका घेण्यात आल्याने हा विषय सध्या दुग्ध व्यवसाय, शेतकरी आणि प्रशासन या तिन्ही स्तरांवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
