Pune Breaking l भेसळयुक्त दूध, अस्वच्छ दुग्धजन्य पदार्थ व मिठाई नष्ट; चार आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित : अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाने 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे व सोलापूर जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवत भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२,२७८ लिटर दूध नष्ट करण्यात आले. तसेच संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्ट येथे अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे आढळल्याने १,१५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करण्यात आले असून परवाना निलंबित करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाई उत्पादन सुरू असल्याने १,८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध नष्ट करून संबंधित परवानाही निलंबित करण्यात आला. याशिवाय, पुण्यातील ताथवडे येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या हॉटेलमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.
To Top