सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती | प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील होळ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत सात विद्यार्थिनींचे आगमन झाले. त्यानिमित्त ग्रामपंचायत होळ येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच सूरज कांबळे, माजी सरपंच विठ्ठल वायाळ, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब लडकत, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, प्रमोद वायाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक ए. एम. डी. जाधव (पीक उत्पादन खर्च योजना, कृषी अर्थशास्त्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
स्वागतानंतर विद्यार्थिनींनी शास्त्रीय पद्धतीने मृदा परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा, त्याची योग्य पद्धतीने हाताळणी करून प्रयोगशाळेत कसा पाठवावा याचे प्रात्यक्षिक सादर केले. मृदा परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता समजून संतुलित खत व्यवस्थापन करता येते, उत्पादन खर्च कमी होतो आणि पीक उत्पादन वाढण्यास मदत होते, अशी माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
या 'रावे' कार्यक्रमात सानिका चौगुले, अनुष्का दाभोळे, तन्वी जगताप, संचिता कांबळे, राशी खुसपे, तेजल राऊत आणि अमृता सातपुते या विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. समन्वयक प्रा. गायकवाड आणि प्रा. बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत कृषी विषयक शास्त्रीय मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
