Pune News l पुणे ग्रामीण जिल्ह्यात जूनच्या 'या' तारखेपर्यंत जमावबंदी लागू, पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास परवानगीशिवाय बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे, प्रतिनिधी 
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश 13 जून 2026 रोजी रात्री 12.05 वाजल्यापासून ते 26 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
या आदेशानुसार दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, काठ्या, तलवारी, बंदुका किंवा इजा पोहोचवू शकणारी कोणतीही साधने जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन अथवा दहन करणे आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आवेशपूर्ण भाषणे करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे यास मनाई करण्यात आली आहे.दरम्यान, हा आदेश शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगण्यास परवानगी असलेल्या व्यक्तींना लागू राहणार नाही.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Tags
To Top