सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे, प्रतिनिधी
प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणास सहमती देणे आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी व ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या मागणीनुसार ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, विमानतळासाठी आवश्यक असलेल्या १ हजार २१६ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत ८५१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. तसेच सुमारे ७० टक्के करारनामे प्रशासनाकडे जमा झाले असून जमीन मालकांना आतापर्यंत सुमारे ९५० कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे. याशिवाय पुढील आठवड्यात आणखी २ हजार कोटी रुपये उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे मूल्यांकन, न्यायालयीन दावे, महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, नाव दुरुस्ती, वारस नोंदी, हक्कसोडपत्र तसेच इतर महसुली प्रक्रियांमुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यासाठी काही कालावधी लागणार आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामपंचायत प्रतिनिधींनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करून जमीन अधिग्रहणास सहमती व मोबदला स्वीकारण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
या मुदतवाढीमुळे प्रलंबित कागदपत्रे आणि महसुली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार असून उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक वेगाने आणि सुलभपणे पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
