सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गणपतीपुळे : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी दुर्दैवी घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून सहलीसाठी आलेल्या पर्यटकांपैकी पाच जण समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील १९ जणांचा एक गट शनिवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळे येथे आला होता. सकाळच्या सुमारास या गटातील काही तरुण समुद्रकिनाऱ्यावर गेले आणि पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील वाढलेल्या लाटा आणि वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाच जण खोल पाण्याकडे वाहून गेले. काही क्षणांतच ते नजरेआड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, लाइफगार्ड, पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रात बोटींसह विविध साधनांच्या मदतीने शोधकार्य सुरू असून बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे तसेच धोकादायक भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
बेपत्ता पर्यटकांची नावे-
आदित्य राऊत
यश कांबळे
अनिकेत हिवराळे
प्रेम आदमाने
आनंद नरवडे
या पाचही तरुणांचा शोध सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. शोधमोहीमेबाबतची अधिकृत माहिती आणि पुढील तपशील प्रशासनाकडून जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.
