सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या एका युवकाचा पाय घसरून तो सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शनिवारी (२० जून) घडली. सुदैवाने तो दरीतील एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तब्बल दोन तास अथक बचावकार्य राबवून युवकाची सुखरूप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश श्रावण बागुल (वय २५, मूळ रा. जळगाव) हा युवक आपल्या कुटुंबीयांसह राजगड किल्ला पाहण्यासाठी आला होता. बालेकिल्ल्याकडे जाताना त्याने मुख्य मार्ग सोडून दुसऱ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाय घसरल्याने तो सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत घसरत गेला. मात्र, एका झाडाला अडकल्याने त्याचा जीव वाचला. या अपघातात त्याच्या पाठीच्या मणक्याला, मानेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी दोरांच्या साहाय्याने अत्यंत सावधगिरीने दोन तास बचावकार्य राबवून युवकाला दरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पोलिस प्रशासन व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या बचाव मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरगे, योगेश गोपी, वैभव भोसले, दिलीप तळेकर, अनिल रेणुसे आणि विशाल पिलावरे यांनी सहभाग घेतला. तसेच पोलीस पाटील सारिका दरडीगे तसेच पर्यटक प्रतीक सावंत आणि रोहित खबाले यांनीही बचावकार्यात मोलाचे सहकार्य केले.
