सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील शिंदेवाडी (विंग) फाट्याजवळ शुक्रवारी रात्री दुचाकीस्वार आणि बिबट्या यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर काही काळ बिबट्या रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडून होता. मात्र, नंतर तो उठून जंगलाच्या दिशेने निघून गेल्याने परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, एक दुचाकीस्वार कराडच्या दिशेने जात असताना विंग-शिंदेवाडी दरम्यान त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोर अचानक बिबट्या रस्त्यावर आला. त्यामुळे दुचाकी आणि बिबट्याची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला, तर बिबट्याही काही काळ रस्त्यावर निपचित पडून होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकीस्वाराला सुरक्षित ठिकाणी हलवले. दरम्यान, काही वेळानंतर बिबट्या अचानक उठून गुरगुरत गर्दीच्या दिशेने धावल्याने उपस्थितांची एकच धावपळ उडाली. नागरिकांच्या आरडाओरडामुळे घाबरलेला बिबट्या नंतर डोंगराच्या दिशेने पसार झाला.
या परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने योग्य उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
