Satara Accident News l जेजुरी दर्शनासाठी जाणाऱ्या भविकांवर काळाचा घाला; ट्रक-मिनीबसच्या समोरासमोर धडकेत दोघांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा येथील डी-मार्टसमोर आज पहाटेच्या सुमारास मिनी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कसाब गावातील भाविक मिनी बसमधून देवदर्शनासाठी जेजुरीकडे जात होते. पहाटे सातारा शहराजवळील डी-मार्ट परिसरात त्यांच्या मिनी बसची भरधाव ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मिनी बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी गाडीत अडकलेल्या जखमी व मृतांना बाहेर काढले.

जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
To Top