सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर - प्रतिनिधी
नीरा- देवघर धरणात तरुणाचा बुडून मृत्यू पुणे येथील चार तरुण वरंधा ता.भोर घाटात फिरण्यासाठी आले असताना निरा - देवघर धरणातील पाणी पाहून तरुण वेणूपुरी जवळून धरणात पोहण्यासाठी उतरले.त्यातील एका तरुणाला पोहता येत नसल्याने पाण्याच्या गाळात बुडून त्याचा मृत्यू झाला.ही घटना रविवार दि.२१ घडली असून देवेश राज मिश्रा वय-२८ रा. लोणी काळभोर ता.हवेली या तरुणाचा मृत्यू झाला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून चार तरुण सुट्टी निमित्त वरंधा घाटात फिरण्यासाठी आले होते.धरण पाहिल्यावर तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नसल्यामुळे त्यांनी नीरा- देवघर धरणात पोहण्यासाठी वेणूपुरी गावातून नदीपात्रात गेले.
परंतु देवेश मिश्रा याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.त्याला वाचविण्यासाठी त्याच्या सोबत असलेल्या तरुणांनी प्रयत्न केले परंतु त्यांना बुडालेल्या तरुणाला वाचवण्यात अपयश आले.
सदर घटनेची माहिती इतर तरुणांनी ११२ नंबरवर कॉल करून कळविली असता भोर पोलीस निरीक्षक निलेश माने, हिर्डोशी बीट अंमलदार अजय साळुंखे,हवालदार,अभय बर्गे,राज दुर्गुळे ,हेमंत भिलारे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेत बुडालेल्या तरुणाचा शोध लावण्याचा शोध घेतला.दरम्यान भोर येथील भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस कर्मचारी यांनी बुडालेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला.
