सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
सातारा शहरालगतच्या खिंडवाडी परिसरात खाणीजवळ उभ्या असलेल्या एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या आणि अमोनियम नायट्रेटचा साठा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
गुरुवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना या साठ्याबाबत माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर व सातारा तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असता तेथे केवळ कंटेनरचा मोठा बॉक्स उभा असल्याचे दिसून आले. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या आणि अमोनियम नायट्रेटचा साठा आढळला. खबरदारीचा उपाय म्हणून परिसर तात्काळ सील करण्यात आला. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरमध्ये सुमारे ४०० किलोपेक्षा अधिक जिलेटिन आणि अमोनियम नायट्रेटचा साठा असल्याचा अंदाज असून, रात्री उशिरापर्यंत त्याची मोजदाद सुरू होती. दरम्यान, हा स्फोटकसाठा नेमका कोणाचा आहे, तो येथे कशासाठी आणण्यात आला, त्यासाठी आवश्यक परवानगी होती का आणि हा साठा कुठून आणण्यात आला, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
जिलेटिन हा अत्यंत धोकादायक स्फोटक पदार्थ मानला जातो. यापूर्वी सातारा जिल्ह्यात जिलेटिन स्फोटांच्या घटनांमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. त्यामुळे शहरालगत एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकसाठा आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
