सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील अतित येथे राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने धडक कारवाई करत देशी व विदेशी मद्याच्या १८६ बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत ३६ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश काशिनाथ सुतार (वय २४) आणि सूरज संतोष यादव (वय २७, दोघे रा. अतित, ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला समर्थगाव, अतित येथे बेकायदेशीरपणे विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी दुचाकीवरून देशी व विदेशी मद्याची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान संशयितांकडून ३६ हजार १८० रुपये किमतीच्या एकूण १८६ मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, विजय मरोड आणि बाळासो पाचुंदे यांनी केली.
दरम्यान, जिल्ह्यात बनावट मद्य, हातभट्टी दारू तसेच बेकायदेशीर मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
