Satara Breaking l शेळीला वाचवताना नातू तडफडताना पाहून आजी धावली... पण काळाने दोघांनाही गाठलं!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी गावात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली असून, तुटलेल्या वीजवाहक तारेच्या संपर्कात आल्याने शेळीसह आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून महावितरणच्या कथित निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्डी गावातील बेंद शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील एका शेळीचा पाय तुटून पडलेल्या जिवंत वीजवाहक तारेत अडकला. विजेचा प्रवाह सुरू असल्याने शेळी तडफडू लागली. हे पाहून तिला वाचवण्यासाठी १३ वर्षीय सुजित काळे पुढे गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो तडफडू लागला.
नातवाला विजेच्या धक्क्याने झुंजताना पाहून ६० वर्षीय आजी मालन काळे यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. परंतु विजेचा तीव्र प्रवाह असल्याने त्यांनाही धक्का बसला. या दुर्घटनेत शेळीसह आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या हृदयद्रावक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून काळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तुटलेल्या वीजवाहक तारेमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, संबंधित यंत्रणांनी घटनेचा तपास सुरू केला असून या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधले जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर शोक व्यक्त करण्यासाठी परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी भेट देत आहेत.
To Top