Pune Crime l बीडीचे थोटके... तंबाखूची पुडी अन् पाण्याची बाटली; केबल चोरटे अखेर जाळ्यात ! १२ गुन्हे उघड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
नारायणगाव : प्रतिनिधी 
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल चोरी करून मोठे नुकसान करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. मध्य प्रदेशातील पाच सराईत चोरांना नाशिक जिल्ह्यातील घोटी (इगतपुरी) परिसरातून अटक करण्यात आली असून, त्यांच्या अटकेमुळे केबल चोरीचे तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरज्या छत्तेसिंग पवार (वय १९, रा. कटनी, मध्य प्रदेश), गगन शापिलाल चौहान (वय १९, रा. खंडवा, मध्य प्रदेश), अतुल शापिलाल चौहान (वय २१, रा. खंडवा, मध्य प्रदेश), तपसलाल सर्कस पवार (वय ५०, रा. कटनी, मध्य प्रदेश) आणि सुरज रामसर आदिवासी (वय ४०, रा. कटनी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.
मागील काही महिन्यांपासून जुन्नर, नारायणगाव, ओतूर आणि पारगाव परिसरातील नदीपात्रांलगत असलेल्या शेतीपंपांच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणीपुरवठा खंडित झाल्याने सुमारे १५० शेतकरी अडचणीत आले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळांवर सापडलेल्या बिडीची थोटके, विशिष्ट प्रकारची तंबाखू पुडी आणि पेयाच्या बाटल्या या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. या वस्तू स्थानिक पातळीवर प्रचलित नसल्याने आरोपी परराज्यातील असावेत, असा संशय पोलिसांना आला.

दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे ही टोळी मध्य प्रदेशातील असून चोरीनंतर नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून, चोरीस गेलेल्या केबलपैकी मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे जुन्नर, नारायणगाव, ओतूर आणि पारगाव परिसरातील केबल चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या सर्व आरोपी नारायणगाव पोलीस कोठडीत असून, त्यांच्या चौकशीतून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांच्या पथकाने केली.
Tags
To Top