Tukaram Mundhe l तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज निर्णयांनी हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ; ग्राहकांना मिळणार सुरक्षित पाणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
इंदापूर : संतोष माने 
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यव्यापी धडक कारवाईमुळे गुटखा विक्रेते, भेसळखोर आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुटखा विक्री, दूध भेसळ आणि अन्न सुरक्षेसंदर्भातील कठोर मोहिमेमुळे ग्रामीण भागातील अनेक पानटपऱ्यांवरून गुटखा जवळपास गायब झाल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, 23 जून रोजी जारी करण्यात आलेल्या नव्या निर्देशांमुळे हॉटेल व्यवसायिकांची धावपळ सुरू झाली आहे. या आदेशानुसार राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय आणि चहाच्या टपऱ्यांमध्ये ग्राहकांना सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांवर बाटलीबंद पाणी खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही.
याशिवाय हॉटेलमधील अन्नपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास बंदी घालण्यात आली असून, कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. वापरलेल्या खाद्यतेलाच्या पुनर्वापरावरही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा मानकांनुसार हॉटेलच्या स्वयंपाकगृहात स्वच्छता राखण्यासाठी भिंती आणि फरश्या टाइल्सच्या असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी साफसफाई, स्वयंपाकगृहांची दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची तयारी सुरू केली आहे.

इंदापूर तालुक्यासह अनेक भागांत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अचानक तपासणीसाठी येऊ शकतात, अशी चर्चा व्यावसायिकांमध्ये सुरू असून नियमांचे पालन करण्यासाठी घाईगडबड सुरू असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वाचे मानले जात असून, गुटखा व भेसळविरोधातील मोहिमेबरोबरच हॉटेलमधील अन्न व पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

"ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नाही" हा संदेश देत अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे राज्यातील अन्न सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.
To Top