सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पंढरपूर, प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावानजीक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळला. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी टेम्पोमध्येच अडकले.
या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघातामुळे रांजणी गावासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटविण्याचे आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
