सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
राज्याच्या ऊर्जा आणि जलव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणात सध्या केवळ ९.३० टीएमसी (९.२८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, पावसाअभावी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. आगामी १५ दिवसही अशीच परिस्थिती राहिल्यास पिण्याचे पाणी, सिंचन आणि वीजनिर्मितीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१०५.२५ टीएमसी साठवण क्षमतेच्या कोयना प्रकल्पात सध्या एकूण १४.५२ टीएमसी (१३.७० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची कमतरता असल्याने कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातून केवळ १६० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू असून, एक हजार मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
दुसरीकडे, कृष्णा लवादानुसार पूर्वेकडील भागातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडावे लागत आहे. सध्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने घटत आहे.
तज्ज्ञांच्या मते, पावसाची स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास सातारा व सांगली जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध न झाल्यास खरीप पिके करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, धरणातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने १९६२ पूर्वी जलाशयाखाली गेलेली जुनी गावठाणे, मंदिरे आणि वस्तींचे अवशेष पुन्हा दिसू लागले आहेत. जलाशयातून स्थलांतरित झालेल्या अनेक कुटुंबांकडून या ठिकाणांना भेटी दिल्या जात असून, पर्यटकांमध्येही मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. शिवसागर जलाशयातील लाँच व तराफेही कोरड्या जमिनीवर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोयना धरणाच्या इतिहासात १९७२, १९९५ आणि २०१४ नंतर यंदा पुन्हा एकदा पाणीपातळी अत्यंत खालावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या आठवणी ताज्या झाल्या असून, लवकरच दमदार पाऊस न झाल्यास राज्यासमोर पाणीटंचाई आणि वीजटंचाईचे मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
