Solapur Breaking l विजय पवार l माता जोगेश्वरी मंदिरासमोर काढलेला फोटो ठरला अखेरचा..! पिकअप विहिरीत कोसळून ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
माळशिरस : विजय पवार 
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. सातारा-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडीजवळ भाविकांची पिकअप गाडी थेट रस्त्याशेजारील विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात महिला आणि लहान मुलांसह ७ ते ८ जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला आहे, तर ८ जण सुखरूप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथून अधिक मासानिमित्त सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन हे भाविक पिकअप वाहनाने पंढरपूर तालुक्यातील रांजणीकडे परतत होते. तांदुळवाडी गावाजवळ आले असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भाविकांनी भरलेली पिकअप रस्त्यालगत असलेल्या एका खोल विहिरीत कोसळली.
अपघाताचा आवाज ऐकताच तांदुळवाडी येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. या अपघातातून ८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने विहिरीतील पाण्याचा अंदाज न आल्याने आणि जोरदार धडकेमुळे ७ ते ८ जणांचा मृत्यू झाला. प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
बचावलेल्या जखमींपैकी दोघांवर तांदूळवाडी येथील डॉ.मिले यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. तर उर्वरित गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनि आशिष कांबळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे संपूर्ण माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळाला माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी भेट देऊन पाहणी केली. 

चौकट 

या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे अधिकाऱ्यांच्या व ठेकेदार च्या निष्काळजीपणामुळे आजची घटना घडली आहे. 
खासदार धैर्यशील मोहिते पाटील 

चौकट : अपूर्ण रस्ता आणि प्रशासकीय दिरंगाई नडली; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सातारा - पंढरपूर रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत पडलेले आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रस्ता पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे हे काम रखडले असून, याच अपूर्ण रस्त्यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप होत आहे. या भीषण अपघातानंतर संतप्त झालेल्या तांदुळवाडी येथील ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल करावा, अशी तीव्र मागणी केली आहे.

To Top