सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : प्रतिनिधी
राजगड तालुक्यातील मालवली गावात किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १४) दुपारी घडली. या घटनेत १८ वर्षीय युवकाचा गळा दाबून खून करण्यात आला असून वेल्हे पोलिसांनी १५ वर्षे १० महिने वयाच्या विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
मृत युवकाचे नाव विकास सुरेश जाधव (वय १८, रा. मालवली, ता. राजगड) असे आहे. याप्रकरणी रोहन पांडुरंग पवार (वय २३, सध्या रा. मालवली, मूळ रा. खवले, ता. पाली, जि. रायगड) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मालवली येथील राजतोरण शाळेच्या मैदानाजवळील आंब्याच्या झाडाखाली काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद मिटवून सर्वजण तेथून निघून गेले. मात्र, कोंढवली फाट्यानंतर आरोपीने पुन्हा मोटारसायकल मैदानाजवळ नेण्यास सांगितले. त्यानंतर विकास जाधव आणि आरोपी यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपीने विकासचा गळा जोरात दाबल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी दोघांना वेगळे केले. मात्र, त्यानंतर विकास बोलत नव्हता तसेच त्याला पाणीही पिता येत नव्हते. त्यामुळे त्याला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले आहेत. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मृतदेहाचा पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
