सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बारामती तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा रामनगर (वाणेवाडी) येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य गणवेश वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती आणि गावातील दानशूर ग्रामस्थांच्या लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
सोमवार (दि. १५ जून) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात शाळेत प्रथमच दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वाणेवाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुषार शिंदे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी, “गावातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी गावातील सर्व नागरिक आणि तरुण मंडळी शाळेच्या पाठीशी कायम उभी राहतील,” अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला सुमित भोसले, सतीश जगताप, संजय चव्हाण, दत्तात्रय हेगडे (गुरुजी), भाऊसाहेब शिंदे, तानाजी शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, भाऊसाहेब चव्हाण, संगीता जाधव आणि काजल बामणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक दिलीप खुडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला. तसेच ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशिक्षक भगवान लकडे यांनी केले.
लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रामनगर शाळेचा शैक्षणिक विकास अधिक बळकट होणार असून, वाणेवाडी परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
