Satara News l साताऱ्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १९ हजारांचा गुटखा जप्त

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सातारा शहरात केलेल्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे १०.२ किलो वजनाचा आणि १९ हजार ७८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका व्यक्तीसह संबंधित उत्पादक कंपन्यांच्या मालक, भागीदार व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम राजू कांबळे (वय २७, रा. एकदंत अपार्टमेंट, करंजे, सातारा) याच्यासह संबंधित उत्पादक कंपन्यांच्या मालक, भागीदार व संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
शासनाने २० जुलै २०२५ पासून एक वर्षासाठी गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर बंदी घातली आहे. असे असतानाही संबंधितांकडे प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान विमल पानमसाला नेव्ही ब्ल्यू, विमल पानमसाला ब्ल्यू, विमल पानमसाला किंग, व्ही-१ टोबॅको किंग, व्ही-१ टोबॅको, रॉयल ७१७ टोबॅको तसेच हिरा पानमसाला या विविध ब्रँडचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या पदार्थांचे एकूण वजन सुमारे १०.२ किलो असून त्याची किंमत १९ हजार ७८ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, सातारा शहर पोलीस ठाणे करीत आहेत.
To Top